घटस्फोट घरगुती हिंसाचार
मराठी कायदे मार्गदर्शन

घटस्फोटाच्या अथवा घरगुती हिंसाचाराच्या न्यायालयीन प्रकरणाची पूर्वतयारी व कागदपत्रांबाबत माहिती

Share

घटस्फोटाच्या अथवा घरगुती हिंसाचाराच्या न्यायालयीन प्रकरणाची पूर्वतयारी व कागदपत्रांबाबत माहिती-
कित्येक वेळा अनेक संसार हे दुर्दैवी कारणांमुळे जसे की घटस्फोट (Divorce) अथवा घरगुती हिंसाचार (Domestic Violence), पती पत्नी यांच्यातील पराकोटीचे वैचारिक मतभेद, कौटुंबिक कलह यामुळे मोडले जातात. अशा वेळी संबंधित पुरुष असेल किंवा स्त्री असेल यांना प्रथम वकिलांकडे संपर्क करावा लागतो. कित्येक वेळा यामध्ये ग्रामीण भागातील लोक विशेषतः स्त्रियांचे प्रमाणही लक्षणीय आहे. अशा वेळेस वकिलांकडून त्यांना त्यांच्या प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यास सांगितले जाते मात्र अशिक्षित तर दूर अगदी सुशिक्षित महिला व पुरुष यांच्याकडूनही वकिलांकडे माहिती देण्यात चुका होतात व महत्वाची माहिती अनावधानाने दिली जात नाही.

त्यामुळे कित्येक प्रकरणांत पक्षकारांचे नुकसान होते. अशा वेळेस महिला व पुरुष पक्षकारांनी व्यवस्थित व परिपूर्ण  माहिती आपल्या वकिलांना द्यावी यासाठी माहितीचा एक नमुना बनविल्यास पक्षकार व वकील यांचा वेळ वाचेलच शिवाय (Divorce) अथवा घरगुती हिंसाचार (Domestic Violence) प्रकरणांत सर्व बाबी व्यवस्थितपणे मांडल्या जातील या अपेक्षेने हा लेख जाहीर करत आहे.

वाचकांनी आपल्या जवळील अशिक्षित व्यक्ती विशेषतः महिला असतील तर त्यांना त्यांच्या प्रकरणांची माहिती लेखी स्वरूपात तयार करण्यास मदत करावी असे आवाहनही या लेखाद्वारे करत आहे. याशिवाय वकील बांधव त्यांच्या पक्षकारांना खालील नमुन्यानुसार माहिती मागवू शकतात जेणेकरून त्यांचाही बहुमुल्य वेळ वाचेल अशी अशा आहे.

तरी कोणत्याही व्यक्तीने विशेषतः महिला पक्षकारांनी वकिलांकडे जाण्यापूर्वी अथवा स्वतःच्या संदर्भासाठी खालीलप्रमाणे घटस्फोट (Divorce) अथवा घरगुती हिंसाचाराच्या (Domestic Violence) प्रकरणांत माहिती व कागदपत्रे तयार ठेवावीत-
१) स्वतःचे लग्न झाल्याचा दिनांक व ठिकाण यांचा सविस्तर तपशील
२) लग्नाच्यापूर्वी असलेली वैवाहिक स्थिती- अविवाहित, घटस्फोटीत ई.
३) तसेच लग्न कसे झाले याचा तपशील- जसे की प्रेमविवाह (Love Marriage) अथवा कुटुंबियांकडून ठरवून केलेले लग्न (Arranged Marriage)
इथे कित्येक जण केवळ साधा संदर्भ देतात ‘जसे की ‘अबक’ या व्यक्तीशी माझे सन २०१७ साली प्रेमविवाह झाला’. मात्र अशी महत्वाची माहिती ही सविस्तर तपशिलासहित व उदाहरण दाखल कशी द्यावी हे खालीलप्रमाणे पहावे-
‘अ याच्याशी माझा प्रेमविवाह झाला. आमची ओळख सोशल मिडियाद्वारे सन २०१५ मध्ये झाली होती. साधारणतः १ वर्ष सोबत मैत्री व जवळीकनंतर अ याने माझ्या कुटुंबियांना १० जुलै २०१६ भेटून माझ्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली व तशी आग्रहाची मागणी केली. अखेरीस २३ जुलै २०१६ रोजी माझा साखरपूडा अ याच्याशी संपन्न झाला, त्यानंतर व २३ डिसेंबर २०१९ रोजी ‘अबक’ मंगल कार्यालय, पुणे येथे आमचा विवाह झाला’. ई.

४) लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची मूळ प्रत
५) लग्नाचे फोटो
६) लग्नाच्या नोंद प्रमाणपत्राची प्रत (Copy of Marriage Registration Certificate)
७) (महिलांसाठी) लग्नापूर्वीचा निवासी पत्ता व लग्नानंतरचा निवासी पत्ता याचा सविस्तर तपशील
८) (महिलांसाठी) लग्नापूर्वीचे नाव व लग्नानंतरचे नाव
९) पतीचे अथवा पत्नीचे संपूर्ण नाव व पत्ता, ई- मेल, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक ई ची सविस्तर माहिती

१०) लग्न खर्चाचा तपशील, लग्नाचा खर्च कसा व कुणी केला याचा सविस्तर तपशील व पुरावा-
उदा. ‘लग्नाच्या वेळेस हुंडा घेण्यात आला नसला तरी लग्नाचा सर्व खर्च माझ्या कुटुंबीयांनी करावा अशी मागणी ‘अ’ याने केली. त्यानुसार साखरपुडा व लग्न यांचा एकत्रित खर्च असा रु.१५ लाख हा माझ्या कुटुंबीयांनी केला.’ त्यासंबंधीचे सविस्तर आणखी तपशील व पुरावे द्यावेत, जसे की लग्नाच्या हॉलचे बील, केटरिंगचे बील, दागिन्याचा खर्च, पाहुण्यांसाठी भेटवस्तू ई. ची बिले त्या ठेवावीत.

११) घरगुती हिंसाचार, मानसिक अथवा शारीरिक छळाचा तपशील-
कित्येक महिला
‘मागील २ वर्षांपासून माझा पती माझा शारीरिक अथवा मानसिक छळ करतो व त्याने दारूच्या नशेत तसेच पैश्यांसाठी मला मारझोड केली आहे’ अशी साधारण माहिती देतात. तसे न देता, खालील उदाहरण वाचावे-
उदा. ‘लग्नाच्या १० व्या दिवशीच माझ्या पतीने माझ्या घरच्यांकडून ‘मला एक कार हवी असून त्यासाठी माहेरच्या कुटुंबियांना सांगून मला रु.५ लाख आणून दे’ अशी मागणी केली. त्यानंतर माझ्या पतीस ‘माझ्या कुटुंबीयांनी लग्नाचा सर्व खर्च केला असून ते मध्यमवर्गीय असल्याने कारसाठी पैसे कोठून आणणार व कसे देणार?’ असे सांगताच दुसऱ्या दिवशी माझ्या पतीने मला दारूच्या नशेत शिवीगाळ केली, व ३ वेळा थोबाडीत मारले’ अशी घटना घडली असेल तर त्याचे सविस्तर तपशील द्यावेत.

इथे विशेष लक्षात घेण्याची बाब म्हणजे जर पतीने अथवा अगदी पत्नीने केलेल्या मारहाणीनंतर पोलीस तक्रार केली असल्यास, अथवा वैद्यकीय तपासणी, औषधे, जखम ई. झाली असल्यास त्याबाबतचा सर्व तपशील हा सोबत ठेवावा. कित्येक वेळा मोबाईल संभाषण अथवा व्होट्सएप चॅटिंगद्वारेही मानसिक छळ केला जातो त्याचे पुरावे हे जतन करून ठेवावेत व त्याचा तपशीलही सोबत ठेवावा. काही वेळेस मारहाण करताना अथवा मारहाण केल्यानंतर झालेल्या जखमा अथवा घटनांचे फोटो अथवा विडीयो काढले असल्यास त्याचे पुरावे सोबत ठेवावे व त्याचा सविस्तर तपशील द्यावा.

याउलट कित्येक पुरुष ‘माझी पत्नी माझा छळ करते, आत्महत्येची धमकी देते’ केवळ असे साधारण माहिती देतात. त्याऐवजी वकिलांकडे जातानाच सर्व घडलेला घटनाक्रम सविस्तर व लेखी तयार करून नेल्यास त्याचा फायदा प्रकारणाची परिपूर्ण तयारी करण्यास होतो,  खालील उदाहरण पहावे-
उदा.
‘लग्नाच्या २ महिन्यानंतर मला कामानिमित्त बाहेर जावे लागणे आणि उशिरा येणे होत असल्याने माझी पत्नी सारखी त्यावरून चिडून असते. १० जुलै २०१७ रोजी मी कामानिमित्त घरी येण्यास उशीर झालो असताना तिने मला थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिने रागाच्या भरात माझ्यावर भांडी फेकली तसेच ‘आता मी आत्महत्या करेन’ असे म्हणून सिलेंडरची नळी उघडी करून काडीपेटीने आग लावण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान माझ्या आई वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही तिने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली’ असा सविस्तर तपशील घटनेच्या दिवसाच्या तपशिलासहित, दिवस आठवत नसल्यास तो आठवडा अथवा महिना यांचा सविस्तर तपशील द्यावा.
अशा प्रकारे घडलेल्या प्रत्येक घटनेचा सविस्तर तपशील द्यावा.

१२) तसेच वर नमूद केलेप्रमाणे लग्नाच्या दिवशीपासून ते आजपर्यंत घडलेल्या घटनांचे सविस्तर तपशील हे घटनाक्रम जसा घडत गेला त्या क्रमानुसार तारीख, महिना व वर्ष असा तपशील देऊन वकीलांसमोर सादर करावा. तसेच वरील पैकी काही माहिती उपलब्ध नसल्यास त्याबाबत वकिलांचा सल्ला घ्यावा.
*भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://wp.me/P9WJa1-MV

१३) पोटगीसाठी (Maintenance) आवश्यक तपशील-
कित्येक महिलांना पोटगीची (Maintenance) मागणी न्यायालयासमोर करायची असते. अशा वेळेस त्यांनी पतीचा माहित असलेला आर्थिक तपशील देणे गरजेचे असते. जसे की,
पती करत असलेल्या व्यवसाय अथवा नोकरीची माहिती,
त्याचा उत्पन्न अथवा त्यास मिळत असलेला पगार,
त्याच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती,
एकत्रित कुटुंबीय अथवा विभक्त कुटुंबपद्धती,
पतीच्या नावावर असलेल्या अथवा तो वापरात असलेल्या संपत्ती जसे की घर, कार्यालय, वाहन, त्याचे राहणीमान ई सर्वांची माहितीचा तपशील तयार ठेवावा.

तसेच महिलांनी पतीपासून विभक्त झाल्यानंतर स्वतःस किती रक्कम मासिक भत्ता म्हणून हवा असेल यासाठी खालील बाबींचा तपशील तयार ठेवावा,
स्वतःस असलेले मूल,
मुलाच्या शाळेचे शुल्क,
मुलांचे कपडे, बूट, शालेय साहित्य, करमणुकीचे खेळ ई,
शाळेस येण्याजाण्याचा खर्च,
पतीसोबत असताना त्यास विशेष करमणूकीचे ठिकाण अथवा विविध सुविधा यासाठी खर्च,
स्वतः मुलासोबत राहणार असलेल्या घराचे भाडे,
अन्न, किराणा, औषधे ई.साठी खर्च,
स्वतःचे कपडे, औषधे तसे प्रासंगिक गोष्टींसाठी लागणारा खर्च ई.

याउलट पतीने पत्नीस न्यायालयाकडून आवाजवी पोटगी मिळू नये व त्यावर आर्थिक ताण पडू नये म्हणून पत्नीच्या आर्थिक तपशील सोबत ठेवावा. जसे की  पत्नी व्यावसायिक आहे अथवा नाही, तिची नोकरी, तिला असलेला पगार, तिचे शिक्षण ई. माहितीचा तपशील सोबत ठेवावा.

१४) अपत्याचा ताबा (Custody of the Child)-
तसेच वकिलांना अपत्याचा ताबा स्वतःकडे ठेवायचा आहे किंवा आपल्या पत्नी अथवा पतीकडे द्यायचा आहे याबाबतही विचार करून निर्णय तयार ठेवावा.

१५) घरगुती महिलांसाठी (Housewife) महत्वाच्या बाबी-
कित्येक वेळा घरगुती महिलांच्या नावाने पतीकडून कंपन्या अथवा फर्म काढण्यात येतात, व्यवसाय चालू केला जातो, त्याचा संपूर्ण कारभार मात्र प्रत्यक्षात पतीकडून अथवा पतीच्या नातेवाईकांकडून पाहण्यात येतो. तसेच बऱ्याच वेळा पत्नीकडून कित्येक कागदपत्रे व चेकवर सह्या घेतल्या जातात व अगदी प्रत्यक्षात तिच्याकडे काहीही पैसे नसले तरी तिच्या नावावर लाखोंची कमाई केली जाते व त्या रक्कमेचा पतीकडून परस्पर विनियोग केला जातो. अशा वेळेस पतीने कोणत्या नावाने कंपनी काढली आहे, अथवा कोणत्या कागदपत्रांवर अथवा बँकेच्या चेकवर आपल्या सह्या घेतल्या आहेत, कर्ज घेतले आहेत ई. माहितीचा तपशीलही स्वतःकडे ठेवावा.  

१६) इतर कागदपत्रे –
तसेच न्यायालयीन प्रकरण दाखल करताना  पासपोर्ट आकाराचे ३ फोटो, आधार कार्ड ओळखपत्र अशा काही कागदपत्रांचीसुद्धा प्रती सोबत ठेवावे व वकिलांनी सांगितल्यास त्यांना उपलब्ध करून द्यावे.

अशा पद्धतीने आधीच तयारी करून कायदेशीर प्रक्रिया वकिलांमार्फत सुरु करण्याचे ठरविल्यास वकील व पक्षकार दोघांचा मौल्यवान वेळ वाचण्यास मदत होते. त्याहून मोठी बाब म्हणजे सुशिक्षित वाचकांनी अशा स्वरूपात अशिक्षित महिलांना मार्गदर्शन केल्यास त्यांना न्यायप्राप्तीस फायदा होऊ शकेल असे माझे मत आहे. घटस्फोट अथवा घरगुती हिंसाचार प्रकरणांसाठी पूर्वतयारी करताना येणाऱ्या समस्या व त्याबाबत सामान्य तक्रारदारांना व वकिल बांधवांनाही या लेखाचा फायदा होईल या उद्दिष्टाने प्रकरण दाखल करण्यापूर्वी महत्वाचे मुद्दे जाहीर करण्याच्या हेतूने हा लेख जाहीर करण्यात आल असून प्रकरण दाखल करणे व त्यानंतरच्या प्रक्रियाही सामान्य जनतेस कळाव्यात यासाठी सविस्तर लेख लवकरच जाहीर करण्यात येईल.

हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व  ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.तसेच या पेजच्या खालील  Subscribe Box मध्ये आपला ई मेल टाकून Subscribe जरूर करा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक इंग्रजी, हिंदी व मराठीतील लेख हे थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!
संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks

ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks
-ॲड.सिद्धार्थशंकर अ. शर्मा
(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)

 

सूचना- कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.


Share

Leave a Reply