सावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श
मराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज

सावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श

Share

काही न्यायालयीन प्रकरणांत पहाटेपर्यंत व सकाळी सुद्धा काम झाल्याने दुपारी काम संपवून झोपणार इतक्यात ‘मी आत्महत्या करणार आहे, मला सावकार खूप त्रास देतायेत’ असा संदेश संघटनेच्या व्होट्सएपवर पाहिला. वकिली सांभाळून संघटनेच्या क्रमांकावर शक्य तसे कायदेशीर मार्गदर्शन करत असतो. मात्र हे प्रकरण गंभीर होते, बॉलीवूडच्या एका अभिनेत्याने त्याच दिवशी आत्महत्या केल्याने गांभीर्य अजून वाढले होते.

कोल्हापूरच्या कांदलगाव येथील रहिवासी श्री.नागेश यांनी त्यांना ३ सावकार हे त्रास देत असून काही जण त्यांना मारहाण करण्यासाठी येणार असल्याचे असल्याचे सांगितले. धक्कादायक म्हणजे त्यातील एकीने (जी महिला आहे!) रु.३०००/- इतक्या कर्जावर रु.२४०००/- इतके व्याज वसूल करून अतिरिक्त रु.५००००/- व्याज दे अन्यथा जीवे मारू अशी धमकी दिली होती, एकाने गाडीची कागदपत्रे जप्त केली होती व त्याच दिवशी संध्याकाळी ७.०० वाजता मारण्यासाठी माणसे पाठविणार असल्याची धमकी देण्यात आली होती.

संघटनेद्वारे तत्काळ संबंधित पोलीस ठाणेस संपर्क करून हा विषय मार्गी लागू शकला असता मात्र तो संघटनेचा उद्देश नाही. लोकांनी स्वतः कायद्याचा वापर करावा व भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढा द्यावा असे तत्व आहे. मात्र श्री.नागेश यांचे शिक्षण झाले नव्हते त्यामुळे श्री.नागेश यांना तत्काळ कायद्याचा ड्राफ्ट बनवून ती तक्रार कोल्हापूर पोलिसांच्या व्होट्सएप ग्रुपवर पाठविण्यास सांगितले होते. मात्र पोलिसांकडून श्री.नागेश यांना ‘तुम्ही स्थानिक पोलिसांना तक्रार करा’ असा संदेश देण्यात आला.

हे सर्व करण्यात संध्याकाळचे ६.३० वाजले होते व ७.०० वाजता जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या लोकांचा समूह मारहाण करण्यासाठी प्रत्यक्ष निघालाही होता. श्री.नागेश हे ‘पोलीस माझ्यावरच कारवाई करतील’ असे म्हणत होते, त्यांना पोलिसांची अनाठायी भीती काढून टाकण्यास सांगितले आणि समजा असा त्रास झालाच तर त्याविरोधात कसे लढावे याची रणनीती सांगितली.

या क्षणी मानसिक आधार देणे गरजेचे होते. ‘शिवरायांचे कर्तुत्व आठवा, बाबासाहेबांचा लढा आठवा, काही नसताना मोठ्या शत्रूंशी त्यांनी लढा दिला ते आठवा, शहीद भगतसिंग फासावर चढण्यापूर्वी फाशीच्या दोराचे चुंबन घेत होते’ असे सांगितल्या क्षणी विशेषतः शिवरायांचे नाव घेताच श्री. नागेश यांच्या आवाजात कमालीचा आत्मविश्वास आला व केवळ अज्ञानाअभावी एक लढवय्या प्राणास मुकला असता असे जाणवले. पोलीस आले नाहीत आणि संबंधितांनी हल्ला केला तर ‘आत्मरक्षणासाठी वाटेल ते करा संघटना पूर्ण पाठीशी उभी राहील, जीव तसेही देणार होताच ना, फासावर लटकताना यातना होणारच होत्या ना, त्यापेक्षा लढून ज्या यातना होतील त्या झेला’ असे सांगितले.

याच दरम्यान श्री.नागेश यांनी पोलीस ठाणे गाठले आणि त्यांना मारण्यास आलेले मारेकरीसुद्धा जवळ पोहोचले होते व कॉल करत होते. पोलिसांसमोरच संबंधित व्यक्तीने कॉलवर धमकी देण्यास सुरु केली आणि इथे कोल्हापूर पोलिसांकडून तत्काळ कार्यवाही करण्यात आली. प्रकरण पोलिसांत गेल्याचे पाहताच सर्व संबंधितांची बोबडी वळाली व ‘आम्ही आजपासून कोणताही त्रास देणार नाही, आम्हाला माफ करा’ अशी विनवणी श्री.नागेश यांना होऊ लागली.

सावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श
सावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श

अर्थातच तपास अजून सुरु आहे व त्यामध्ये श्री.नागेश यांना संघटनेतर्फे मार्गदर्शन करीत आहेच. यापुढे जो लढा होईल त्यात बऱ्याच बाबी असतील त्यामुळे पुढे काय होईल याबाबत आताच सांगणे योग्य नाही.

मात्र आत्महत्येसाठी निघालेला एक निरक्षर तरुण आता पोलिसांसमोर कायद्याने क्रांतिकारी लढा देत आहे. ‘आज कित्येक दिवसानंतर जेवलो, तुमच्यामुळे मी जिवंत आहे’ असा श्री.नागेश यांचा संदेश मोठे समाधान देऊन गेला. कोणतेही शिक्षण नसताना मी सांगितले तसे कायद्याची कलमे न अडखळता सांगणारे, लढण्यास तयार रहा सांगितले की हिम्मतीने लढा देणारे श्री. नागेश यांचे प्राण वाचले आहेत. कोल्हापूर पोलिसांचेही तूर्तास तरी विशेष कौतुक करावेसे वाटते.

यापूर्वीही कित्येकांना संघटनेद्वारे मी जाहीर केलेल्या लेखांचा फायदा झाला आहे व त्यासाठी धन्यवाद म्हणून आलेल्या संदेशांनी खूप समाधान प्राप्त होतो. मात्र या प्रकरणात मला मिळालेल्या समाधानाची तुलनाच करू शकत नाही. कारण एक अशिक्षित परंतु लढवय्या भारतीय तरुण आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर येऊन आज जीवावर उदार होऊन क्रांतिकारी लढा देत आहे याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी असू शकत नाही, एक लढवय्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत, अर्थातच अजून मोठा लढा बाकी आहे…जयहिंद!
-ॲड.सिद्धार्थशंकर अ. शर्मा
(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)

बेकायदा सावकारी विरोधात कसे लढाल?
युट्युबविडीयो-
https://youtu.be/q35cxlHFSrQ
सावकारी संदर्भात महत्वाचे लेख-
सावकारीविरोधात कसे लढावे?महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी व अधिकारींचे पत्ते व संपर्क क्रमांक यांची माहिती-
https://wp.me/p9WJa1-1I


Share

2 thoughts on “सावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श”

  1. तुम्ह्चा लाख मोलाचा सल्ला व मार्गदर्शन संकटग्रस्त व्यक्तीला दिल्यामुळे त्या नागेशच्या अंगात अन्यायाविरोधात लढण्याची हिम्मत आली व त्याच्या वरील संकट पार पडले .हि मोठी कौतुस्पद क्रांती आहे.आजच्या युगात.धन्यवाद !

Leave a Reply