अन्याय व भ्रष्टाचार विरोधात तक्रार कायद्याने लढाई
मराठी कायदे मार्गदर्शन

अन्याय व भ्रष्टाचार विरोधात कायद्याने लढाईस सुरुवात कशी करावी? सविस्तर मार्गदर्शन

Share

अन्याय व भ्रष्टाचार विरोधात कायद्याने लढाईस सुरुवात कशी करावी? सविस्तर मार्गदर्शन-
सामान्य जनतेस अन्याय व भ्रष्टाचार विरोधात लढाईची सुरुवात कशी करावी हा संभ्रम असतो, अगदी तक्रार कशी करावी? कुठे करावी? कोणत्या अधिकारीकडे करावी? याबाबत काय मजकूर लिहावा? याबाबत माहिती नसल्याने आणि कोणतीही न्यायालयीन लढाई अथवा आंदोलनामध्ये तक्रारीची सुरुवात व त्यापुढील रणनीती हा पाया असल्याने इथे करण्यात आलेली चूक ही नंतर प्रचंड महागात पडू शकते, म्हणून अन्याय व भ्रष्टाचार विरोधात लढताना सुरूवातीस काय रणनीती वापरावी आणि त्याची सुरुवात कशी करावी, याबाबत माझे वैयक्तिक मत हे मी या लेखाद्वारे जाहीर करत आहे.

१) कोणत्या अधिकारीकडे तक्रार करावी?-
सर्वप्रथम आपली तक्रार ज्या शासकीय विभाग, लोकसेवक अथवा अधिकारीसमोर आपण मांडणार आहोत त्यांना तक्रार निवारण करण्याचे सक्षम अधिकार कायद्याने आहेत किंवा नाहीत याची खात्री करून घ्यावी. कित्येक प्रकरणांमध्ये तक्रारदार हे ज्या विभागास अथवा अधिकारीस कारवाई करण्याचे अधिकार नाहीत त्यांना तक्रार करतात किंवा त्यांना आपल्या मागणीनुसार कारवाई करण्याचे पत्र मागतात. संबंधित विभागसुद्धा हेतूपुरस्पर सक्षम अधिकार नसताना तसे चुकीचे आदेश देतात जे नंतर न्यायालयात संबंधित अधिकारीस सक्षम अधिकार नसल्याने रद्द होतात आणि तक्रारदाराचा बहुमूल्य वेळ वाया जातो व मानसिक आणि आर्थिक नुकसान होते ते वेगळेच.

तसेच काही विभाग तक्रारीवर हेतूपरस्पर कोणतीही कारवाई करत नाहीत अथवा उत्तर देत नाहीत आणि कित्येक महिने, काही प्रकरणात तर कित्येक वर्षांनी आमच्या विभागास त्यावर कारवाई करण्याचे अधिकारच नाहीत असे लेखी उत्तर तक्रारदारास देण्यात येते आणि तक्रारदाराचा भ्रमनिरास होतो. त्यामुळे आपल्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी आपण जिथे तक्रार करत आहोत त्या अधिकारीस अथवा विभागास तसे अधिकार आहेत किंवा नाही त्यासंबंधी परिपत्रक किंवा कायदा वाचून तक्रार करावी.
उदा. खाजगी शाळांवर प्रशासक नेमायचे अधिकार हे शिक्षण संचालक याना आहेत मात्र कित्येक जण शिक्षक उप संचालक अथवा शिक्षण अधिकारी यांच्याकडून तसे पत्र घेतात जे नंतर न्यायालयात संबंधित अधिकारींना अधिकार नसल्याने रद्द होऊ शकते.

२) एकाच प्रकरणात अनेक अधिकारी अथवा विभागास तक्रार करणे-
काही प्रकरणांत एकाच विषयावर अनेक विभागांना कारवाईचे अधिकार असतात, उदाहरणार्थ बेकायदा सावकारीच्या प्रकरणात सहकार विभाग तसेच पोलिसांना कारवाईचे अधिकार आहेत. त्याचप्रमाणे शाळांच्या बेकायदा शुल्कवसुली विरोधात गुन्हे दाखल करण्याचा अधिकार शिक्षण उपसंचालक तसेच पोलीस विभागासही आहेत. त्यामुळे आपण एकाच वेळी दोन्ही विभागांना तक्रार करू शकता, एका विभागाकडून न्याय न मिळाल्यास दुसरा विभाग न्याय मिळवून देऊ शकतो, परिणामी याबाबतची माहिती घेऊन संबंधित प्रत्येक शासकीय विभाग, लोकसेवक अथवा अधिकारीसमोर तक्रारदाराने तक्रार दाखल करावी.

३) तक्रार लेखीच करावी व तक्रारीची पोच घेणे अत्यंत गरजेचे-
तक्रारदाराने लेखी तक्रार करून त्याची पोच घ्यावी व तोंडी तक्रार करणे कटाक्षाने टाळावे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण कित्येक तक्रारदार शासकीय विभाग, लोकसेवक अथवा अधिकारीसमोर केवळ तोंडी तक्रार आणि कित्येक महिने त्यावर तोंडी पाठपुरावा करत राहतात. मात्र संबंधित अधिकारीकडून कोणतीही कारवाई होत नाही आणि अशा वेळेस जेव्हा न्यायालय अथवा जनआंदोलन करण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस तक्रारदाराकडे संबंधित विभागास कारवाई करण्यासाठी तक्रार केल्याचा कोणताही पुरावा नसतो आणि न्यायालय पुराव्याच्या आधारे चालत असल्याने अशा वेळेस तोंडी तक्रारीची कोणतीही किंमत राहत नाही आणि त्याची मोठी किंमत मोजावी लागते.

४) लेखी तक्रार दाखल करणे आणि पोच घेणे-
तक्रारदाराने मूळ प्रत शासकीय कार्यालयात दाखल करावी आणि झेरॉक्स काढून त्या विभागाच्या संबंधित अधिकारीकडून (सामान्यतः क्लर्ककडून)-
१) ज्यादिवशी तक्रार दिली ते दिनांक नमूद करून घ्यावे,
२) त्याची सही घ्यावी,
३) आवक क्रमांक उपलब्ध असल्यास घ्यावा,
४) आणि त्या विभागाचा शिक्का जरूर घ्यावा.

५) तक्रारीची पोच न दिल्यास काय करावे?
वर नमूद केलेप्रमाणे सर्व शासकीय विभागांना तक्रारीची पोच देणे कायद्याने बंधनकारक आहे आणि जर ते त्यास नकार देत असतील (विशेषतः सामान्य जनतेस पोलीस ठाणेस ही समस्या अधिक येते) तर त्याच दिवशी त्याच्या वरिष्ठांना व त्या विभागाच्या मंत्री तसेच इतर सर्व वरिष्ठ कार्यालयांना त्यांच्या ईमेल आयडी वर ‘आज मी या कार्यालयात तक्रार दाखल करायला गेलो असता मला कोणतीही पोच देण्यात आली नाही म्हणून मी ही तक्रार आपणास पाठवत आहे याची दखल घ्यावी’ असे नमूद करावे. इतकेच नाही तर त्या कार्यालयाचा पत्ता नमूद करून भारत सरकारच्या पोस्टाच्या रजिस्टर एडी या सुविधेद्वारे ती तक्रार पोस्टानेही पाठवावी आणि तक्रारीच्या सुरुवातीस ‘मी ‘——‘ या दिनांक रोजी आपल्या कार्यालयात आलो असता आपण तक्रारीची पोच देण्यास नकार दिला म्हणून ही तक्रार पोस्टाने पाठवत आहे’ असे स्पष्ट नमूद करावे.

६) लेखी तक्रारीचे स्वरूप-
आपण कोणत्याही अधिकारीस तक्रार करताना सुरुवातीस-
१) ‘प्रति’ लिहून त्याखाली त्याचे नाव, हुद्दा,पत्ता ई लिहावे,
२) त्यानंतर ‘प्रेषक’ असे लिहावे आणि त्याखाली स्वतःचं संपूर्ण नाव, पूर्ण पत्ता पिन कोड सहित टाकावा तसेच स्वतःचा ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकसुद्धा लिहावा.
३) त्यानंतर ‘विषय’ असे लिहून अत्यंत संक्षिप्त मध्ये आपल्या तक्रारीचा मथळा तिथे लिहावा त्यानंतर मुख्य तक्रारीची सुरुवात करावी.

७) तक्रारीमध्ये काय लिहावे?-
मुख्य तक्रारींमध्ये मी वारंवार कित्येक तक्रारदारांना सल्ला देत असतो की केवळ संबंधित अधिकारीकडे आपल्यावर झालेला अन्याय अथवा संबंधित अधिकारीकडून करण्यात येणारे कर्तव्यात कसूर याबाबत केवळ कायद्याचे कलम किंवा संबंधित कायदा व त्यानुसार होणारे बेकायदा कृत्य याचाच केवळ संदर्भ द्यावा व त्यानुसार जी काही घटना घडली किंवा अन्याय झाला आहे ते कायद्यानुसार कसे बेकायदा आहे किंवा संबंधित अधिकारीवर त्या बेकायदा कृत्याच्या विरोधात कारवाई करणे कसे गरजेचे आहे किंवा बंधनकारक आहे असे नमूद करून केवळ कायद्याला अनुसरूनच तक्रार करावी, विनाकारण इतर गोष्टी त्यामध्ये लिहिण्याचे टाळावे, कारण नंतर हीच तक्रार न्यायालयात दाखल होणार असते किंवा विविध आयोगात मांडली जाते आणि मग अशा वेळेस ती जेवढी संक्षिप्तमध्ये व मुद्देसूद असेल तितक्या प्रभावीपणे मांडणे शक्य होते.

८) मुख्यमंत्री व प्रधानमंत्री कार्यालयाच्या तक्रार निवारण प्रणालीस तक्रारीची प्रत दाखल करावी-
वर नमूद केल्याप्रमाणे मुख्य अधिकारी, त्यांचे वरिष्ठ, त्या खात्याचे मंत्री ई यांच्याकडे तक्रार दाखल केल्यानंतर बहुतांश राज्यात मुख्यमंत्री कार्यालयकडून तक्रार निवारण प्रणाली ही वेबसाईटद्वारे जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री कार्यालयतर्फे केंद्रीय मंत्रालय अथवा केंद्रीय संस्थांच्या विरोधातील तक्रारीसाठी तक्रार निवारण प्रणाली जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या लिंक खालीलप्रमाणे आहेत-
१) महाराष्ट्र ‘आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली’ पोर्टल लिंकसाठी क्लिक करा
२) प्रधानमंत्री कार्यालयाचे तक्रार निवारण पोर्टलसाठी क्लिक करा

इथे एक बाब लक्षात घ्यावी, अनेकांना अशा तक्रार प्रणालीद्वारे तक्रार दाखल करूनही कोणतीच कारवाई न झाल्याची उदाहरणे आहेत तर दुसरीकडे कित्येकांना न्यायही मिळाला आहे. मात्र अशी तक्रार करण्याचे मुख कारण म्हणजे असे प्रकरण न्यायालयात गेल्यावर अशा प्रमुखास तक्रार पाठवली असल्याची नोंद होते तसेच जर काही प्रकरणे चिघळली किंवा दुर्दैवाने त्यातून गंभीर प्रकरण उद्भवले अथवा उद्भवण्याची शक्यता असेल तर त्या तक्रारी अधिक गांभीर्याने अधिकारींना अग्रेषित केल्या जातात किंवा राज्य शासनास होणाऱ्या गंभीर परिणामास तयार रहावे लागते.

९) माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज करणे-
वर नमूद केल्याप्रमाणे मुख्यमंत्री अथवा प्रधानमंत्री कार्यालयास तक्रार दाखल केल्यानंतर त्याचवेळेस अधिकारींपासून मंत्रीपर्यंत सर्वाना ‘मी दि.——‘ रोजी केलेल्या तक्रारीस अनुसरून आपले विभागाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीची मला सविस्तर माहिती द्यावी’ असा माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्जही करावा.

वरीलप्रमाणे कार्यवाही केल्यानंतर आपण सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण करता आणि त्यानंतर आपणास न्यायालयात अथवा विविध आयोगात याचिका करायची असेल अगदी आंदोलन करायचे असेल तरी कायद्याने सर्व तक्रारीची प्रक्रिया पूर्ण केली असल्याने तांत्रिक बाबी अभावी आपले प्रकरण नाकारले जाऊ शकत नाही व शासन हे न्यायालय अथवा जन आंदोलन दरम्यान कुणाचीही दिशाभूल करू शकत नाही.

वरीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्वतः विविध न्यायालय अथवा आयोगात तक्रार कशी कराल याबाबत नमुना याचिका सहित लेख वाचा-
तक्रार व केस कशी करावी- न्यायालय, आयोग अधिकारी ई. साठी नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन
या लेखाचा सर्वसामान्य जनतेस नक्की फायदा होईल व अन्याय व भ्रष्टाचार विरोधात लढा अधिक प्रभावी व यशस्वी होईल असा मला विश्वास आहे, जयहिंद!

*भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://wp.me/P9WJa1-MV

हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व  ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.तसेच या पेजच्या खालील  Subscribe Box मध्ये आपला ई मेल टाकून Subscribe जरूर करा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक इंग्रजी, हिंदी व मराठीतील लेख हे थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!
संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks

ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks
-ॲड.सिद्धार्थशंकर अ. शर्मा
(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)

सूचना- कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.


Share

4 thoughts on “अन्याय व भ्रष्टाचार विरोधात कायद्याने लढाईस सुरुवात कशी करावी? सविस्तर मार्गदर्शन”

  1. Pingback: Anonymous
  2. साहेब नमस्कार,आपला हा उपक्रम खूप चांगला आहे तरी सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार केला तर हा उपक्रम खूप चांगला आहे.🙏

Leave a Reply